रेल्वेमध्ये नोकरी निघाण्याची जाहिरात अनेकदा वृत्तपत्रांमध्ये छापून येते. मात्र रेल्वेतील सर्वात मोठ्या कॅटरिंग सर्व्हिसेसपैकी एक असणाऱ्या आर के असोसिएट्स या कंपनीने दिलेल्या जाहिरातीवरुन वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीमध्ये अपेक्षित कौशल्यांमध्ये अमुक एका समाजाच्या व्यक्तींनीच रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करावा असं नमूद करण्यात आलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये सेवा पुरवणाऱ्या आर के असोसिएटने वृत्तपत्रांमध्ये एक नोकरीची जाहिरात छापली होती. यामध्ये त्यांनी १०० कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची संधी असल्याची ही जाहिरात होती. यामध्ये रेल्वे फूड प्लासा व्यवस्थापक, ट्रेनमधील कॅटरींग व्यवस्थापक, किचन व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले. मात्र या जाहिरातीमधील पात्रतेच्या मुद्द्यांमध्ये भारतात कुठेही काम करण्याची तयारी हवी या अटीबरोबरच अर्जदार अग्रवाल वैश्य समाजातीलच हवे असं नमूद करण्यात आलं होतं. या जाहिरातीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आणि हे प्रकरण अगदी रेल्वे प्रशासनापर्यंत गेले. त्यानंतर ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ने म्हणजेच आयआरसीटीने हस्तक्षेप केला आणि संबंधित कंपनीला नोटीस पाठवली. “आयआरसीटीसीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीने ही जाहिरात देणाऱ्या एचआर व्यवस्थापकवर कारवाई करत त्याची नोकरीवरुन हकालपट्टी केली आहे. या कारवाईची माहिती कंपनीने रेल्वे प्रशासनाला दिली आहे,” असं रेल्वेच्या प्रवक्तांनी स्पष्ट केलं आहे.

रेल्वेच्या जाहिरातींमध्ये अशाप्रकारे विशिष्ट समुदायाला प्राधान्य देणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. याप्रकरणामध्ये आता कारवाई करण्यात आली असून जाहिरात मागे घेण्यात आली आहे. नवीन जाहिरात कंपनीमार्फत लवकरच जारी केली जाणार असल्याचे समजते.