सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या सरचार्जच्या नावाखाली प्रवाशांकडून ११ कोटीपेक्षा जास्त रक्कम भारतीय रेल्वेनं वसुल केली आहे मात्र या सुपरफास्ट ट्रेन्सपैकी ९५ टक्के गाड्या उशिरानं पोहचल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. NCR अर्थात नॉर्थ सेंट्रल रेल्वे आणि SCR अर्थात साऊथ सेंट्रल रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसाठी सरचार्ज म्हणून प्रवाशांच्या खिशातून घेतलेली रक्कम ११ कोटींच्याही पुढे आहे. मात्र याच सुपरफास्ट गाड्यांच्या वेळा ९५ टक्के कोलमडल्याचं समोर आलं आहे.

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी दिलेल्या अहवालात ही माहिती उघड केली आहे. कॅगनं दिलेल्या दिलेल्या एका अहवालानुसार रेल्वेमध्ये मिळणारं जेवण हे माणसांच्या खाण्याच्या लायकीचं नसल्याचं समोर आलं आहे. ही बातमी मागे पडते न पडते तोच सरचार्जसंदर्भातली ही बातमी समोर आली आहे. प्रतितास ५५ किमीपेक्षा जास्त वेग असलेल्या एक्स्प्रेसना सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हटलं जातं.

२०१३ ते २०१६ या वर्षांमध्ये एनसीआर आणि एससीआरच्या २१ सुपरफास्ट गाड्यांच्या १६ हजार ८०४ फेऱ्यांपैकी ३ हजार फेऱ्या उशिरा झाल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तर कोलकाता-आग्रा या भागात धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांच्या १४५ फेऱ्यांपैकी पैकी १३८ फेऱ्या उशिरानं झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हैदराबाद ही एक्स्प्रेस एकूण फेऱ्यांपैकी ६८२ फेऱ्यांच्यावेळी उशिरानं धावली आहे. या २१ सुपरफास्ट एक्स्प्रेस आपला अपेक्षित वेग गाठूच शकल्या नाहीत आणि हे प्रमाण सुमारे ९५ टक्के आहे अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे सरचार्जची वसुली प्रवशांकडून झाली असली तरीही या कालावधीत ज्या प्रवाशांनी या २१ एक्स्प्रेसमधून प्रवास केला त्यांना उशिराच पोहचावं लागल्याची बाब उघड आहे.

सुपरफास्ट गाड्यांमध्ये जनरल कोचसाठी १५ रूपये, स्लीपरसाठी ३० रूपये, एसी चेअर कार, एसी थ्री, एसी सेकंड यासाठी ४५ रूपये सरचार्ज आहे. तर फर्स्ट एसीसाठी ७५ रूपये सरचार्ज घेतला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर प्रवाशांनीही भरूनही ते आपल्या इच्छित स्थळी उशिराच पोहचले आहेत हे वास्तव आता नियंत्रक आणि लेखा परीक्षकांच्या अहवालामुळेच समोर आलं आहे. भारतीय रेल्वेचा पर्याय देशातले बहुतांश लोक प्रवासासाठी वापरत असतात, सुपरफास्ट सरचार्ज म्हणून जो कर भरायचा असतो तोही मुकाट्यानं भरत असतात, असं असलं तरीही या प्रवाशांना वेळेत पोहचवण्यात रेल्वे अपयशी ठरल्याची वस्तुस्थितीच समोर आली आहे.