आसाम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी लुमडिंग राखीव जंगलात दोन हत्तींच्या मृत्यूप्रकरणी माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेचे इंजिन जप्त केले आहे. हत्तीणी आणि तिच्या पिल्लाचा रेल्वे रुळ ओलांडताना धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारची करावाई केली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात रेल्वेविरूद्ध कठोर भूमिका घेण्यात येईल असे आसामचे पर्यावरण व वनमंत्री परिमल सुकलाबैद्य यांनी सांगितले.

२७ सप्टेंबर रोजी लुमडिंग आरएफ येथे मालगाडीच्या रेल्वे इंजिनची धडक बसून हत्तीणी आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार रेल्वे प्रशासनाविरूद्ध कारवाई करणार असल्याचे आसामचे मुख्य वन्यजीव वार्डन महेंद्रकुमार यादव यांनी सांगितले. या कायद्यानुसार वन विभागाने चौकशी केल्यांनतर अधिकाऱ्यांनी २० ऑक्टोबरला बामुनीमैदान लोको शेड येथे जाऊन डिझेल लोको इंजिन ताब्यात घेतले. अंतर्गत चौकशीनंतर लोको पायलट व त्याच्या सहाय्यकाला रेल्वेने निलंबित केल्याची माहिती महेंद्रकुमार यादव यांनी दिली.

लुमडिंग राखीव जंगलात गाड्यांचा वेग हा ताशी ३० किलोमीटर असावा असा निर्णय या आधीच घेण्यात आला होता. तसेच आसाम वन विभागाने ईशान्य रेल्वे विभागाला यासंदर्भात पत्र देखील लिहिले होते.

रेल्वे इंजिनाचा वेग जास्त असल्याने हत्तीणी आणि तिच्या पिल्लाला जीव गमवावा लागला असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर लोको पायलट व त्याच्या सहाय्यकावर कारवाई करण्यात आली आहे. आसाम वन विभागाने बामुनीमैदान रेल्वे यार्ड येथे असलेल्या इंजिनची तपासणी केल्यानंतर अर्ध्या तासानंतर पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.