रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या स्थितीची माहिती सहज आणि अचूक मिळणार आहे. रेल्वेने आपले इंजिन इस्त्रोच्या उपग्रहाशी जोडले आहेत. त्यामुळे उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे आगमन आणि प्रस्थानांची माहिती नोंदवणे सोपे जाणार आहे. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल.

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षांत ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. रेल्वेच्या आगमन, प्रस्थानाची माहिती मिळणे आणि कंट्रोल चार्ट नोंदवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) उपग्रहावर आधारित रिअल टाइम ट्रेन इन्फर्मेशन सिस्टिमचा (आरटीआयएस) वापर सुरू करण्यात आला आहे.

ही प्रणाली ८ जानेवारीला माता वैष्णोदेवी-कटरा वांद्रे टर्मिनस, नवी दिल्ली- पाटणा, नवी दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-जम्मू मार्गावरील काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत अंमलात आली आहे. नव्या प्रणालीमुळे रेल्वेला आपल्या नेटवर्कमध्ये रेल्वेच्या संचालनासाठी नियंत्रण तसेच रेल्वे नेटवर्कला आधुनिक करण्यासाठी मदत मिळेल.

इंजिनमध्ये आरटीआयएसयुक्त इस्त्रो द्वारा विकसित गगन जियो पोजिशनिंग सिस्टिमचा वापर केला जात आहे. यामुळे रेल्वेचा वेग आणि स्थितीबाबत माहिती मिळू शकते.

रेल्वेच्या हालचालींची ताजी माहिती इस्त्रोच्या एस-बँड मोबाइल सॅटेलाईट सर्व्हिसचा (एसएमएस) उपयोग करून सीआरआयएस डाटा सेंटरमधील सेंट्रल लोकेशन सर्व्हरवर पाठवले जाते.

सीएलएसमध्ये प्रोसेसिंगनंतर ती सूचना कंट्रोल ऑफिस अॅप्लिकेशन (सीओए) सिस्टिमला पाठवले जाते. त्यामुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय कंट्रोल चार्ट आपोआप अपडेट होते. पूर्वी रेल्वेची परिचालन स्थिती रेल्वे कर्मचारी स्वत: अपडेट करत.