प्रति किलोमीटर १ ते ४ पैसे वाढ; उपनगरी प्रवाशांना मात्र दिलासा

नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे प्रवास महाग झाला आहे. उपनगरी रेल्वेला या भाडेवाढीतून वगळण्यात आले असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अन्य सर्व प्रकारच्या रेल्वे भाडय़ांमध्ये प्रति किलोमीटर एक ते चार पैसे वाढ करण्यात आली आहे.

रेल्वेच्या तिकीटदरात वाढ करण्याचे सूतोवाच गेल्या आठवडय़ात रेल्वे मंत्रालयाने केले होते. देशातील गरीब-कनिष्ठ आर्थिक गटातील प्रवाशांसाठी रेल्वे अत्यंत सोयीची असल्याने रेल्वेने प्रवासी भाडेवाढ केलेली नव्हती. यापूर्वी २०१४-१५ मध्ये प्रवासभाडे वाढण्यात आले होते. रेल्वेने वेळोवेळी प्रवाशांच्या सोयीसुविधांचा विस्तार केला आहे. त्या कायम ठेवण्यासाठी रेल्वे भाडेवाढ करणे अपरिहार्य असल्याचे मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सामान्य विनावातानुकूलित रेल्वेगाडय़ांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा, एक्स्प्रेस विनावातानुकूलित रेल्वेगाडय़ांसाठी प्रतिकिलोमीटर दोन पैसे, तर वातानुकूलित प्रवासासाठी प्रति किलोमीटर चार पैसे वाढवण्यात आले आहेत.

शताब्दी, राजधानी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गरीबरथ, गतिमान, जनशताब्दी, राज्य राणी, युवा एक्स्प्रेस, सुविधा, मेमू या रेल्वेगाडय़ांचा प्रवासही महाग झाला आहे. आरक्षण शुल्क, उपकर, आदींमध्ये बदल झालेला नाही. वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार वस्तू व सेवा कर बदलेल.

  • उपनगरी रेल्वेभाडय़ात वाढ नाही.
  • उपनगरी रेल्वेचा मासिक
  • पास आधीइतकाच राहील.
  • सामान्य विनावातानुकूलित: द्वितीय श्रेणी, शयनयान प्रथम श्रेणी- १ पैसा
  • मेल- एक्स्प्रेस विनावातानुकूलित: द्वितीय श्रेणी, शयनयान प्रथम श्रेणी- २ पैसे
  • वातानुकूलित: चेअर कार, थ्री टियर, टू टियर, प्रथम श्रेणी- ४ पैसे