तिकीटावर १००० वर्ष पुढची तारीख असल्या कारणाने ७३ वर्षीय प्रवाशाला ट्रेनमधून जबरदस्ती उतरवल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने रेल्वेला दंड ठोठावला आहे. रेल्वेच्या चुकीमुळे तिकीटावर १००० वर्ष पुढची तारीख छापली गेली असतानाही, टीसीने प्रवाशावर जबरदस्ती करत चालू प्रवासात ट्रेनमधून उतरायला लावले होते. शाहरनपूर येथील ग्राहक न्यायालयाने प्रवाशाला नाहक त्रास दिल्याप्रकरणी रेल्वेला दंड ठोठावला आहे.

निवृत्त शिक्षक विष्णूकांत शुक्ला १९ नोव्हेंबर २०१३ रोजी हिमगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. शहारनपूर ते जौनपूर असा त्यांचा प्रवास होता. प्रवासादरम्यान टीसीने त्यांच्या तिकीटावरील तारीख २०१३ ऐवजी ३०१३ असल्याचं पाहिलं आणि मुरादाबाद येथे त्यांना जबरदस्तीने ट्रेनमधून खाली उतरवलं.

‘मी जे व्ही जैन डिग्री कॉलेजमध्ये हिंदी विभागाचा प्रमुख होतो. मला इतकंच सांगायचं आहे की मी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांपैकी नाही. पण तरीही टीसीने सर्वांसमोर मला तुच्छ वागणूक देत माझा अपमान केला. त्याने माझ्याकडे ८०० रुपये दंड भरण्याची मागणी केली. इतकंच नाही तर मला ट्रेनमधून उतरायला लावलं. माझ्या मित्राच्या पत्नीचं निधन झालं असल्या कारणाने मला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं’, अशी माहिती विष्णूकांत शुक्ला यांनी दिली आहे.

जवळपास पाच वर्ष ही केस सुरु होती. मंगळवारी न्यायालयाने विष्णूकांत शुक्ला यांच्या बाजूने निकाल देत रेल्वेला मानसिक त्रास दिल्याबद्दल १० हजारांचा तसंच अतिरिक्त तीन हजारांचा दंड ठोठावला.

न्यायालयाने निकाल देताना सांगितलं की, ‘मध्यमवयीन व्यक्तीला प्रवासाच्या मधेच खाली उतरवणे शारिरीक आणि मानसिक छळ आहे. रेल्वेने दिलेल्या सेवेत काही त्रुटी असल्याचं स्पष्ट आहे’. दरम्यान रेल्वेने याप्रकरणी भाष्य करणं टाळलं आहे.