नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात पश्चिम बंगाल, आसाम व बिहार राज्यातील आंदोलनावेळी जाळपोळ व गुंडगिरी करणाऱ्या २१ समाजकंटकांची ओळख भारतीय  रेल्वेने पटवली असून त्यांच्याकडून या नुकसानीपोटी ८७.९९ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे असे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका अधिकाऱ्याने सांगितले.

संसदेत नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर देशाच्या विविध भागांत हिंसाचार झाला होता त्यात आंदोलक व पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाली. काही आंदोलकांनी बस जाळल्या, रेल्वे मार्गावर ठिय्या देऊन रेल्वेचे डबे जाळले. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी २७ गुन्हे दाखल केले असून  रेल्वे सुरक्षा दलाने दाखल केलेल्या ५४ गुन्ह्य़ात २१ जणांना अटक करण्यात आली आहे. ते सर्वजण जाळपोळ व हिंसाचारात  सामील होते. त्यात रेल्वेच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. यात ज्यांना अटक करण्यात आली त्यांची ओळख ही चित्रफितींच्या माध्यमातून पटवण्यात आली तर काहींना घटनेवेळीच अटक करण्यात आली होती. आणखी समाजकंटकांना शोधण्यासाठी चित्रफिती पाहण्याचे काम चालू आहे. अटक केलेले बहुतांश लोक हे बंगालमधील आहेत. रेल्वेच्या वाणिज्य विभागाने ज्यांना अटक केली त्यांच्याकडून नुकसानीचे पैसे वसूल करण्यासाठी  नोटिसा जारी केल्या आहेत.