जर तुम्ही रेल्वेने नियमित प्रवास करत असाल, तर लवकरच तुमच्या खिशाला झटका बसणार आहे. सरकार आता सामान्य श्रेणीतील रेल्वे तिकिटांवर सुरक्षा कर लावणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तिकिट दरांवर २ टक्के सुरक्षा अधिभार लावणार असल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने दिले आहे. यामधून मिळणाऱ्या रकमेचा वापर रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी केला जाणार आहे.

रेल्वेच्या सामान्य श्रेणीतून आणि आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ९४% इतकी आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना सुरक्षा अधिभारामुळे वाढलेल्या तिकिट दरांचा फटका बसणार आहे. मागील काही वर्षांपासून एसी-१ आणि एसी-२ श्रेणीतील तिकिटांचे दर वाढवण्यात आले आहेत. सामान्य श्रेणी आणि आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्यांना मात्र या तिकिट दरवाढीचा सामना करावा लागला नव्हता. मात्र आता या प्रवाशांनादेखील सुरक्षा अधिभारामुळे तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या तिकिटांच्या दरातदेखील वाढ होणार आहे.

केंद्र सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली असलेल्या भारतीय रेल्वेवर सध्या ३२ हजार कोटी रुपयांचा बोजा आहे. रेल्वेच्या दैनंदिन कामकाजाचा खर्च अतिशय जास्त आहे. त्यामुळेच रेल्वेला मोठा तोटा सहन करावा लागतो. तिकिटांवर सुरक्षा अधिभार लावल्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात ५ हजार कोटींचा महसूल मिळतील, असा रेल्वे मंत्रालयाचा अंदाज आहे. या रकमेचा वापर रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी वापरले जाणार आहेत. २०१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे सुरक्षा निधीचा उल्लेख केला होता.

‘आपल्याला रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा निधी उभारावा लागेल. यामध्ये देशातील सर्वसामान्य जनता रेल्वेला सहकार्य करेल, अशी आशा आहे,’ असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. यासोबतच आम्ही निधीच्या उभारणीसाठी इतर पर्यायांचादेखील विचार करत असल्याचे प्रभू यांनी सांगितले.