सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे खासगीकरण करण्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्ना मागील काही काळापासू नसुरु केला आहे. दरम्यान याच संदर्भात आज केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारवर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे. मंगळवारी लोकसभेमध्ये बोलताना गोयल यांनी देशातील सर्व रस्ते हे राष्ट्रीय मालमत्ता आहेत. मात्र कोणी असं म्हटलं नाही की या रस्त्यावर केवळ सरकारी गाड्या चालल्या पाहिजे. रस्ते राष्ट्रीय मालमत्ता असली तरी त्यावर खासगी गाड्या चालत ना?, असा प्रश्न त्यांनी खासगीकरणाला विरोध करणाऱ्यांना विचारलाय. मात्र त्याचवेळी रेल्वेचे पूर्णपणे खासगीकरण कधीच केलं जाणार नाही असंही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. रेल्वेच्या खासगीकरणावरुन विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारच्या धोरणांसदर्भात प्रश्न उपस्थित केलेले.

मंगळवारी खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर रेल्वेमंत्री गोयल खूपच अक्रामक झाल्याचे पहायला मिळालं. “आमच्यावर रेल्वेचे खासगीकरण केल्याचा आरोप केला जातोय. मात्र लोकांनी कधीही असं म्हटलं नाही की रस्त्यांवर केवळ सरकारी गाड्याच चालल्या पाहिजे.  कारण सरकारी आणि खासगी दोन्ही पद्धतीच्या गाड्या आर्थिक दृष्टीने फायद्याच्या असल्याने राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या रस्त्यांवर सरकारी गाड्या चालवण्याचाच युक्तीवाद कोणी करत नाही,” असं गोयल म्हणाले. यामधून गोयल यांनी खासगी रेल्वे गाड्या चालवल्या जणार असल्या तरी रेल्वे मार्ग आणि वाहतुकीसंदर्भातील यंत्रणा ही रेल्वेच्याच मालकीची राहणार असल्याचे संकेत दिलेत. खासगी रेल्वे गाड्यांची खासगी गाड्यांशी तर लोहमार्गांची रस्त्यांशी तुलना करुन गोयल यांनी रेल्वेच्या खासगीकरणाचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये केला.

पुढे बोलताना रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणुकीचं स्वागत केलं. “रेल्वेमध्ये खासगी गुंतवणुकीचे स्वागत केलं पाहिजे. कारण असं झाल्यास अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होतील,” असं गोयल यांनी म्हटलं. रेल्वेच्या योजना आणि रेल्वे प्रवासादरम्यानच्या सुरक्षेसंदर्भातही गोयल यांनी भाष्य करताना गुंतवणुक वाढल्यास प्रवाशांच्या सुरक्षेवर जास्त भर देता येईल. प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देत असल्याने रेल्वे अपघातामध्ये रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होण्याची शेवटची घटना २०१९ मध्ये घडल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार; खातेदारांना काय करावं लागणार?

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चालवण्यात आलेल्या रेल्वेसंदर्भातही गोयल यांनी सभागृहामध्ये माहिती दिली. “लोकांनी लॉकडाउनच्या निर्णयावर टीका केली. मात्र असं करायला नको होते. रेल्वे सेवेच्या माध्यमातून देशभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होतो,” असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी सोडलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचाही गोयल यांनी उल्लेख केला. “रेल्वेने प्रवासी मजुरांसाठी दोन कोटी अन्नाची पाकिटं मोफत वाटली. पाण्याच्या बाटल्याही मोफत वाटल्या. तसेच ४६०० श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या,” असं गोयल यांनी सांगितलं. विशेष म्हणजे लॉकडाउननंतर जवळजवळ वर्षभरानंतरही अनेक राज्यांमध्ये मर्यादित किंवा कमी प्रमाणात रेल्वे सेवा पुरवली जात आहे.