बुधवारपासून रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पाच ऐवजी दहा रुपये करण्यात येत असून कडधान्ये, युरिया व इतर मालासाठी रेल्वेचे मालवाहतूक भाडे १० टक्के वाढवण्यात येत आहे. यापुढे तुम्ही १२० दिवस आधी रेल्वेचे तिकीट आरक्षित करू शकणार आहात. यापूर्वी रेल्वे तिकिटाचे आरक्षण ६० दिवस आधी करता येत होते. अन्नधान्ये, डाळी, युरिया यांच्या मालवाहतूक दरात १० टक्के, कोळसा वाहतूक दरात ६.३ टक्के वाढ रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार लागू करण्यात येत आहे. सिमेंट वाहतुकीसाठी २.७ टक्के दरवाढ केली असून भंगार सामान व कच्च्या लोखंडासाठी ३.१ टक्के मालवाहतूक दरवाढ करण्यात येत आहे.
पोलाद व लोह खनिजाच्या वाहतुकीचे दर ०.८ टक्के वाढवले असून बिटय़ूमिन, कोलटार यांच्या मालवाहतुकीत ३.५ टक्के दरवाढ करण्यात येत आहे. या दरवाढीमुळे पुढील आर्थिक वर्षांत १,२१,४२३ कोटी रुपये मिळणार आहेत. चालू वर्षी म्हणजे २०१४-१५ मध्ये मालवाहतुकीतून मिळालेले उत्पन्न १,०६,९२७ कोटी रुपये होते. रेल्वेने ११८६ दशलक्ष टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट २०१५-१६ या वर्षांत ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षांत ते ११०५ मेट्रिक टन इतके होते.