उंदीर मारण्यासाठी पश्चिम रेल्वेने तीन वर्षात तब्बल दीड कोटी रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. एका माहिती अधिकार अर्जाद्वारे मागवण्यात आलेल्या माहितीला उत्तर देताना या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

माहिती देताना पश्चिम रेल्वेने म्हटले की, रेल्वे स्थानकांच्या परिसरात पेस्ट कन्ट्रोलसाठी (उंदीर मारण्याचे औषध) पश्चिम रेल्वेकडून तीन वर्षात दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या विभागाच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्थानकांमध्ये तीन वर्षात ५,४५७ उंदरांना मारण्यासाठी १.५२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे हा भारतीय रेल्वेचा सर्वात छोटा विभाग आहे. पश्चिम भारताला उत्तर भारताशी जोडण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे नियोजन या विभागाकडे असते.

जर या खर्चाची टक्केवारी काढण्यात आली तर रेल्वेने यार्ड आणि रेल्वे कोचमध्ये पेस्ट कन्ट्रोलच्या औषध फवारणीसाठी दररोज १४ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम खर्च करुनही दररोज केवळ पाचच उंदीर मारले गेले आहेत. आकडेवारीतून ही माहिती समोर येत असली तरी पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंदर भाकर यांनी म्हटले की, अशा प्रकारे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

भाकर म्हणतात, एकूण खर्चाशी मारल्या गेलेल्या उंदरांची तुलना करणे चुकीचे आहे. या सर्व गोष्टींमध्ये फायद्याच्या दृष्टीने विचार केल्यास एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की, गेल्या दोन वर्षांमध्ये यापूर्वीच्या तुलनेत उंदरांनी सिग्नलच्या तार कुरतडल्याने सिग्नल फेल होण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

दरम्यान, रेल्वे कोच आणि यार्डमध्ये कीटक आणि कुरतडणाऱ्या प्राण्यांपासून जसे उंदरांपासून निपटण्यासाठी रेल्वे खास एजन्सीजकडून सेवा घेते. या एजन्सीजचे काम रेल्वे रोलिंग स्टॉक, स्टोशन परिसर आणि यार्ड परिसरात औषधाची फवारणी करुन उंदरांच्या समस्येपासून सुटका करणे हे आहे. अशा प्रकारे किटक आणि उंदरांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वटवाघूळ, चिकट फलक, काही विषारी रसायनं आणि पिंजरा यांसारख्या गोष्टींचा वापर केला जातो.