रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार थेट ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली आणि पुढच्या दोन तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर) अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही झाली. अगदी वेगाने झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी बाडमेरहून बिकानेरला निघाले होते. नियमाप्रमाणे सामान्य तिकीट काढून गाडीमध्ये टीटीआयकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून या गाडीतून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची कोणतीही पावती गोविंद नारायण यांना दिली नाही. त्यामुळे लगेचच त्यांनी सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना मेन्शन करून या संदर्भातील ट्विट केले. या एका ट्विटमुळे सरकारी कार्यालयातील सूत्रे वेगाने फिरली. लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि त्यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनेक प्रवाशांकडून १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क गोळा करून त्यांना त्याबदल्यात कोणतीही पावती देण्यात आलेली नव्हती. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले.