नवी दिल्ली : करोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेने गुरुवारी आणखी ८४ गाडय़ा रद्द केल्याचे जाहीर केले. या गाडय़ा २० ते ३१ मार्च या कालावधीत धावणार नसल्याने रद्द करण्यात आलेल्या गाडय़ांची एकूण संख्या आता १५५ झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी कोणत्या गाडय़ा रद्द करावयाच्या याचा निर्णय बुधवारी रात्री घेण्यात आला आणि या निर्णयाची अंमलबजावणी २० ते ३१ मार्च या कालावधीत केली जाणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयआरसीटीसीमार्फत चालविण्यात येणाऱ्या दोन तेजस एक्स्प्रेस आणि एक हमसफर एक्स्प्रेस यांचा रद्द करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये समावेश आहे.या १५५ गाडय़ांसाठी ज्या प्रवाशांनी तिकिटे घेतली होती, त्या प्रत्येकाला या बाबतची माहिती देण्यात आली आहे. तिकिटे रद्द करण्यासाठी लागणारा आकार प्रवाशांकडून आकारण्यात येणार नाही, प्रवाशांना तिकिटाचा १०० टक्के परतावा मिळेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

लेहमधून आलेले ७८ प्रवासी श्रीनगरमध्ये विलगीकरण कक्षात

श्रीनगर : लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह येथून आलेल्या ७८ जणांना करोनाची लागण झाल्याच्या संशयावरून काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी विलगीकरण कक्षात ठेवले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.लडाखमधून काश्मीरमध्ये येणाऱ्या सर्वाना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. श्रीनगरबाहेर उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षात ७८ प्रवाशांना ठेवण्यात आले आहे, तेथे वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना भेटण्यासाठी येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.