भारतीय रेल्वेने देशात करोना व्हायरसविरोधात लढ्यासाठी स्वस्त व्हेंटिलेटर ‘जीवन’ तयार केले आहे. हे व्हेंटिलेटर पंजाबच्या कपुरथला येथील ‘रेल्वे कोच फॅक्टरी’मध्ये(आरसीएफ) बनवण्यात आले आहेत. ‘जीवन’ व्हेंटिलेटरची किंमत कंप्रेसरशिवाय जवळपास दहा हजार रुपये असेल. सध्या देशात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत पाच ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे. मात्र, अद्याप रेल्वेने बनवलेल्या ‘जीवन’ व्हेंटिलेटरसाठी ‘आयसीएमआर’ची मंजुरी मिळालेली नाही.

“एकदा आयसीएमआरची मंजुरी मिळाल्यानंतर, दररोज 100 व्हेंटिलेटर बनवण्याची आमची तयारी आहे”, अशी माहिती रेल्वे कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक रविंद्र गुप्ता यांनी दिली. “आरसीएफच्या टीमने हे व्हेंटिलेटर तयार केले असून आवश्यकतेनुसार याचा आकार बदलता येऊ शकतो. या व्हेंटिलेटरमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही. आवाज न करता हे व्हेंटिलेटर काम करतं. आम्ही आज अखेरची चाचणी घेतली आणि आता आमच्याकडे सक्षम व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहे. याची किंमत बाजारातील व्हेंटिलेटरपेक्षा बरीच कमी असेल. जीवन व्हेंटिलेटरची किंमत कंप्रेसरशिवाय जवळपास दहा हजार रुपये असेल. यामध्ये काही इंडिकेटर लावले तरीही याची किंमत ३० हजाराच्या पुढे जाणार नाही”, असे गुप्ता म्हणाले.

ब्रूकिंग्सच्या एका रिपोर्टनुसार, देशात व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. सध्या देशातील व्हेंटिलेटर्सची संख्या जवळपास 57 हजार आहे, पण जर करोना व्हायरसमुळे परिस्थिती अजून बिघडली तर देशात 15 मेपर्यंत 1.10 लाख ते 2.20 लाख व्हेंटिलेटर्सची गरज लागू शकते. सध्या देशात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत पाच ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे.