भारतीय रेल्वेमध्ये जवळपास एक हजार डिझेल इंजिनं दाखल होणार आहेत. या इंजिनांमुळे रेल्वेचा वेग वाढणार असल्याचे बोलले जात आहे. पुढील अनेक वर्षांसाठी ही इंजिनं रेल्वेच्या सुविधेमध्ये अतिशय उपयुक्त ठरतील अशी आशा आहे. ‘जीई ट्रान्सपोर्टेशन’तर्फे या वर्षीच्या जूनमध्ये ही इंजिनं तयार करण्यात आली आहेत. त्यानंतर दोन महिने टेस्टींग केल्यानंतर ही इंजिने रंगविण्यात आली आहेत. या इंजिनांना लाल आणि पिवळा रंग देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ही इंजिनं अमेरिकेत बनविण्यात आली असून यापुढील इंजिने कंपनी आपल्या बिहारमधील प्लांटमध्ये तयार करणार आहे. हे काम ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या गडद रंगांचे विशेष महत्त्व असून पिवळा रंग उत्साहवर्धक आहे तर लाल रंग ऊर्जा देणारा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आतापर्यंत या इंजिनांसाठी ५० गॅलन रंग वापरण्यात आला असून पर्यावरणामध्येही हे रंग उठून दिसतील असेही कंपनीकडून सांगण्यात आले.

आता सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकेतून ४० इंजिनं आयात करण्यात येणार आहेत. या एका इंजिनाला २ बोग्या असतील. ही इंजिनं या वर्षाच्या शेवटी प्रत्यक्ष रेल्वेच्या सेवेत दाखल होतील. यामध्ये दोन प्रकारची इंजिनं असून ४५०० हॉर्सपॉवर आणि ६००० हॉर्सपॉवरची इंजिने सध्या तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत. एकूण १००० इंजिनांची निर्मिती करण्यात येणार असून पुढच्या टप्प्यातील इंजिन भारतातील बिहारमध्ये तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशमधील रोझा आणि गुजरातमधील गांधीधाम याठिकाणी इंजिनांची देखभाल करण्यासाठी शेड बांधण्यात येणार आहेत.