करोना संकटाच्या काळामध्ये रेल्वेला प्रवासी वाहतूक बंद असल्याने महसुलामध्ये मोठा तोटा झाला. मात्र एकीकडे प्रवासी वाहतूक बंद असल्याने तोटा होत असतानाच दुसरीकडे रेल्वेने हा तोटा भरुन काढण्याचाही प्रयत्न केल्याचं चित्र दिसत आहे. भारतीय रेल्वेने भंगार विकून विक्रमी महसूल गोळा केला आहे. भांगार विकून भारतीय रेल्वेने चांगली कमाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरामध्ये भारतीय रेल्वेने २०२०-२१ मध्ये ४५७५ कोटी रुपयांचं भंगार विकलं आहे. यापूर्वी २०१०-११ मध्ये ४ हजार ४०९ कोटींचं भंगार विकून रेल्वेने बक्कळ कमाई केली होती. १० वर्षांपूर्वीचा हा विक्रम आता मोडीत निघालाय.

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार करोनाच्या साथीमुळे रेल्वेला फटका बसला असला तरी २०२०-२१ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत भंगार विकून झालेल्या कमाईच्या तुलनेत यंदा ५ टक्के वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये ४३३३ कोटींच्या भंगाराची विक्री झाली. २०२०-२१ मध्ये भंगार विक्रीतून झालेल्या कमाईची आकडेवारी ४५७५ इतकी आहे.

रेल्वे भंगार म्हणून काय काय विकतं?

जुने झालेले रेल्वे ट्रॅक्स, त्यासंदर्भातील लोखंडी सामान, रेल्वे ट्रॅक्सचे नुतनीकरण केल्यानंतर उरलेल सामान, जुने डब्बे, जुनी रेल्वे इंजिन यासारख्या गोष्टींचा भंगारामध्ये मसावेश करण्यात येतो. जलग गती मार्गावरील विद्युतीकरण, डिझेल इंजिन्स बदलणे आणि कारखान्यांमध्येही डब्बे बनवताना मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या गोष्टींच्या माध्यमातून भंगार निघतं. मागील काही वर्षांपासून रेल्वेला महसूल गोळा करण्यासाठी हे चांगलं माध्यम मिळालं आहे.

रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भंगार विक्रीचा व्यवहार अधिक सोपा आणि पारदर्शक होण्यासाठी अनेक निर्णय मागील काही काळात घेण्यात आलेत. भंगाराचा लिलाव इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केला जात असल्याने यामध्ये भ्रष्टाचारा होणार नाही याची काळजी घेतली जाते. या लिलावामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांच्याच दृष्टीने हे फायद्याचे ठरते असं रेल्वेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

रेल्वे बोर्डाने सन २०२१-२२ मध्ये भंगाराच्या विक्रीमधून किमान ४१०० कोटींची कमाई करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये करोनामुळे रेल्वेला पुन्हा फटका बसला असला तरी २० जूनपर्यंत रेल्वेने भंगार विक्रीमधून ४४४ कोटी रुपयांची कमाई केलीय.