प्रवासापूर्वी रेल्वे रद्द झाल्यास त्याचा एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा रेल्वेने सुरू केली आहे. या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना ते ज्या रेल्वेगाडीने प्रवास करणार आहेत ती रद्द झाली तर त्याची माहिती मिळणार आहे. सध्या प्रायोगिक स्वरुपात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. रेल्वेगाडी रद्द झाली की नाही, याची माहिती न मिळाल्यामुळे प्रवाशांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये, यासाठी एसएमएस पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.
सध्या ज्या स्थानकावरून गाडी सुटणार आहे तिथपासून ज्यांनी आरक्षण केले आहे, त्यांनाच हा एसएमएस मिळणार आहे. लवकरच प्रवासाच्या दरम्यान येणाऱया इतर स्थानकावरून आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही असा एसएमएस पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले. रेल्वे रद्द झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर प्रवाशांना त्याबद्दल एसएमएसच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. जेणेकरून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करता येईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.