नवी दिल्ली: रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या ब्लँकेट्सच्या अस्वच्छतेबाबतच्या तक्रारीची दखल घेत भारतीय रेल्वे सध्या प्रवाशांना देण्यात येत असलेल्या ब्लॅँकेट्सच्या ऐवजी डिजाइनर ब्लॅंकेट्स उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. या नव्या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.

प्रवाशांना देण्यात येणारे ब्लँकेट्स महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा धुण्याचे निर्देश असूनही रेल्वेतील ब्लँकेट्स सहा महिन्यातून एकदा धुतले जात असल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. तर अस्वच्छतेच्या या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रेल्वे मंत्रालय नॅशनल इंस्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाईनिंगच्या (एनआयएफटी) मदतीने हलक्या वजनाच्या व धुण्यास सोपी असणारी ब्लॅँकेट्स तयार करणार आहे. या कमी जाडीच्या ब्लॅंकेट्सची चाचणी मध्य रेल्वेत केली जात आहे.

रेल्वेकडून वातानुकूलित डब्यात प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना दोन बेडशीट्स, टॉवेल, उशी आणि ब्लॅँकेट्स असा संच पुरवला जातो सध्या रेल्वेकडे ३.९० लाख संच उपलब्ध आहेत. प्रवाशांना स्वच्छ ब्लँकेट्स पुरवण्याचे प्रमाण वाढविले जाणार असून त्यांच्या जागी नवी तलम कपडय़ाचे हलके ब्लॅँकेट्स टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.