गर्दीच्या मोसमात रेल्वे तिकिटे मिळवण्यासाठी होत असलेल्या अडचणी बघता आता रेल्वेने ‘तत्काळ स्पेशल’ ही नवीन सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. नेहमीच्या रेल्वेभाडय़ापेक्षा जास्त भाडे देऊन तातडीने जाऊ इच्छिणाऱ्यांना प्रवास करता येईल. तत्काळसाठी गर्दीच्या मार्गावर खास गाडय़ा सोडल्या जातील, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रीमियम ट्रेन्सचे भाडे किती ठेवावे याबाबत विचार सुरू आहे. तत्काळ सेवेच्या तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार असून हे दर १७५ ते ४०० रुपये असणार आहेत. तत्काळ दर द्वितीय वर्गासाठी मूळ भाडय़ाच्या १० टक्के तर वातानुकूलित वर्गासाठी मूळ भाडय़ाच्या ३० टक्के असणार आहे. हे तत्काळ तिकीट ऑनलाइनवर बुक करता येईल.