एका प्रवाशाला रेल्वेतून प्रवास करताना उंदीर चावला. याची नुकसान भरपाई म्हणून त्याला २५ हजार रूपये देण्यात यावेत असे आदेश ग्राहक पंचायतीने दिले आहेत. बुधवारी यासंदर्भातले केसची सुनावणी झाली ज्यामध्ये रेल्वेने प्रवासात उंदीर चावलेल्या प्रवाशाला २५ हजारांची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २ हजार रूपये इलाज खर्च म्हणून आणखी द्यावेत असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

४ वर्षांपूर्वी तामिळनाडू येथील वेंकटचलम हा प्रवासी ट्रेनने चेन्नईला जात होता. त्यावेळी ट्रेनमध्ये त्याला एक उंदीर चावला. ज्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना वेंकटचलमने या संदर्भातली तक्रार केली मात्र त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर वेंकटचलमने ग्राहक पंचायतीत धाव घेतली. त्यानंतर चार वर्षांनी हे प्रकरण निकाली काढत वेंकटचलम या प्रवाशाला २५ हजारांची नुकसान भरपाई रेल्वेने द्यावी असा निर्णय देण्यात आला.

जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष आर. व्ही. दीनदयालन आणि सदस्य एस राजालक्ष्मी यांनी या प्रकरणातला निर्णय दिला. वेंकटचलमला रेल्वेमुळे मनस्ताप सहन करावा लागला त्यामुळे या प्रकरणी रेल्वेने २५ हजारांची नुकसान भरपाई दिली पाहिजे असेही ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. ८ ऑगस्ट २०१४ या वेंकटचलमने रेल्वे प्रवास केला. या प्रवासात त्याला उंदीर चावला. त्याने या संदर्भात केलेल्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्याने ग्राहक पंचायतीत धाव घेतली होती. आता ग्राहक पंचायतीने या प्रकरणी रेल्वेला २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.

तुम्हालाही जर रेल्वे संदर्भात काही तक्रार करायची असेल तर सगळ्यात आधी रेल्वे स्टेशनवर असलेल्या तक्रार पुस्तिकेत तक्रारीची नोंद करा. त्यानंतर त्याचा फोटो मोबाइलमध्ये काढून ठेवा. आपल्याकडचे प्रवास तिकिट सांभाळून ठेवा. त्यानंतर ग्राहक पंचायतीत तुम्ही तक्रार करू शकता. मात्र तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पुरावे असणे आवश्यक आहे.