केरळातील कोझिकोडे येथे मुसळधार पावसामुळे आलेली पूरस्थिती तसेच ठिकठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये गुरुवारी ४ जणांचा मृत्यू तर ८ जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. कोझिकोडेचे जिल्हाधिकारी यु. व्ही. जोसे यांनी ही माहिती दिली असून यात ५ घरेही उध्वस्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, पावसाच्या कहरामुळे मृत्युमुखी पडलेल्या ४ जाणांचे मृतदेह आत्तापर्यंत सापडले असून बेपत्ता लोकांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) एका पथकाकडून हे शोधकार्य सुरु आहे.


त्याचबरोबर राज्याच्या उत्तर भागात सातत्याने ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असून येथील वयानंद आणि कन्नूर जिल्ह्यात कमीत कमी १२ दरड कोसळल्याच्या घटनांचीही नोंद झाली आहे. येथे पावसाचा मोठा फटका बसलेल्या भागात अनेक घरे उध्वस्त झाली असून कोट्यवधी रुपयांच्या नकदी पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सुरु असलेल्या या मुसळधार पावसाच्या कहरामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणच्या सुमारे २००० लोकांना पुनर्वसन शिबिरांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. अजूनही राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत असून नद्यांचे प्रवाह वेगाने वाहत आहेत. त्यामुळे नद्यांच्या या पाण्याने रौद्ररुप धारण केल्याचे काही ताज्या व्हिडिओंमधून समोर आले आहे.