उत्तराखंडमध्ये सोमवारी पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्यामुळे बचावकार्यावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे चामोली, रुद्रप्रयाग या उंचीवरील जिल्ह्यामध्ये दरडी कोसळल्याने लष्कराने तयार केलेले तात्पुरते रस्ते पुन्हा एकदा वाहून गेले आहेत. हवामान खराब असल्यामुळे सोमवारी सकाळपासून एकही हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या सुमारे दहा हजार पर्यटकांची सुटका आणखी लांबलीये.
बद्रिनाथमधील पर्यटकांची सुटका करण्यासाठी सहस्रधारामधून हेलिकॉप्टर रवाना होणार होते. मात्र, पावसामुळे हवामान अत्यंत खराब असल्यामुळे दृश्यमानता खूप कमी झालीये. त्यामुळे कोणतेही हेलिकॉप्टर उड्डाण करू शकलेले नाही. गुप्तकाशीत अडकलेल्या पर्यंटकांच्या सुटकेसाठीही एकही हेलिकॉप्टर रवाना झालेले नाही.
बद्रीनाथमधून सुमारे पाच हजार पर्यटकांची सुटका करायची आहे. मात्र, खराब हवामानामुळे सकाळपासून एकही हेलिकॉप्टर उडालेले नाही, असे निवृत्त विंग कमांडर कॅप्टन आर. एस. ब्रार यांनी सांगितले. हवाई मार्गाने पर्यटकांची सुटका करण्याची जबाबदारी ब्रार यांच्याकडे देण्यात आली आहे.
मी स्वतः सकाळपासून हेलिकॉप्टरमध्ये बसलोय आणि हवामानात कधी सुधारणा होतेय, याची वाट बघतोय, असे ब्रार यांनी सांगितले.