चेन्नई : चक्रीवादळ बुरेवी पंबन आणि कन्याकुमारी यादरम्यानच्या तटवर्ती क्षेत्रावर येऊन धडकण्याच्या बेतात असतानाच बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने तमिळनाडू आणि पुडुचेरीच्या अनेक भागांना झोडपून काढले.

श्रीलंकेतून हे वादळ पंबन येथे धडकणार असून तेथून ते पंबन आणि कन्याकुमारीच्या तटवर्ती क्षेत्राकडे सरकणार आहे, असे हवामान विभागाने ट्विटर म्हटले आहे. चक्रीवादळामुळे कोडावसल, नागपट्टिणम, वदारनयाम, कराईकल, मुदुकुलातून या कावेरी त्रिभुज परिसरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी नऊ ते २० सेंमी पावसाची नोंद झाली.

गृहमंत्र्यांचे मदतीचे आश्वासन

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू आणि केरळला शक्य ती सर्व मदत देण्यास केंद्र सरकार बांधील असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी तमिळनाडू आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

बुरेवी चक्रीवादळ श्रीलंकेतून पुढे

’ श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रांतात बुधवारी रात्री धडकलेल्या बुरेवी चक्रीवादळाने विशेष नुकसान झाले नसले तरी त्याचे परिणाम आणखी २४ तास जाणवणार आहेत, असे श्रीलंकेच्या हवामान विभागाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले.

’ त्रिंकोमाली जिल्ह्य़ातील थिरियाया आणि कुचचावेली गावांदरम्यान बुधवारी रात्री हे चक्रीवादळ धडकले, असे आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेकडील जिल्ह्य़ांमध्ये २०० मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र अधिकाऱ्यांना अपेक्षित असलेल्या परिणामांपेक्षा त्याचा प्रभाव कमी होता.

’ पावसामुळे पूर येण्याचे आणि वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडले, परंतु मालमत्तेचे विशेष नुकसान झाले नाही. त्रिंकोमाली जिल्ह्य़ात १२ घरे पाण्याखाली बुडाली. त्याचप्रमाणे ६३० हून अधिक कुटुंबांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे, तर १७०० हून अधिक कुटुंबांनी सुरक्षित स्थळी जाण्याची स्वत:च व्यवस्था केली.