करोना नसलेल्या खासदारांनाच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्याचे बंधन घालण्यात आल्याने संसदेच्या सर्व सदस्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यात २५ खासदार करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

करोनाबाधित असलेल्या खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक १२, वायएसआर काँग्रेसचे २, शिवसेना, द्रमूक, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. संसद सदस्य, कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा २५०० हून अधिक जणांच्या चाचण्या केल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) सोमवारी दिली. करोनाबाधित खासदारांमध्ये मीनाक्षी लेखी, अनंत हेगडे, सुखबीर सिंग, सुकांता मुजुमदार, जनार्दन सिग्रीवाल, विद्युत महतो, प्रधान बरूआ, प्रताप पाटील, रामशंकर कठेरिया, प्रवेश साहेब सिंह, सत्यपाल सिंह, रोडमल नागर (भाजप), हनुमान बेनिवाल (आरएलपी), प्रतापराव जाधव (शिवसेना), एन. रेडीप्पा (वायएसआर काँग्रेस), जी. सेल्वम (द्रमूक) आदींचा समावेश आहे.

संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या ७२ तास आधी चाचण्या करण्याची सूचना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना केली होती. त्यानुसार संसदेच्या स्वागत कक्षात चाचण्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. संसदेच्या कर्मचाऱ्यांची चाचणी आधीपासूनच केली जात होती. मात्र, ११ आणि १२ सप्टेंबर या दोन दिवसांत अनेक संसद सदस्यांनी रांगा लावून चाचणी करून घेतली होती.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुमारे ४०० लोकसभा खासदार उपस्थित होते. करोनाचे संकट असतानाही इतक्या मोठय़ा संख्येने लोकप्रतिनिधी कामकाजात सहभागी होतात, हे प्रगल्भ लोकशाहीचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पहिल्या दिवसाचे चार तासांचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांकडे व्यक्त केली. संसदेने सदस्यांना करोना प्रतिबंधक संच दिला असून, त्यात एन-९५ मुखपट्टी, विषाणूरोधक हातमोजे आदींचा समावेश असल्याची माहितीही बिर्ला यांनी दिली.  संसद सदस्यांपकी किमान २०० सदस्य ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आहेत. वयोमर्यादेचे कारण देत अनेकांनी अधिवेशनाला उपस्थित न राहण्याची परवानगी लोकसभा अध्यक्षांकडून घेतली आहे.

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सकाळी ९ वाजता सुरू झाले. त्याआधी प्रत्येक खासदाराला मोबाइल अ‍ॅपवर हजेरी मांडावी लागली. अनेक खासदार ही प्रक्रिया समजून घेत होते. प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला व तो संमतही करण्यात आला. मात्र, त्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. बहुतांश पक्षनेत्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यास संमती दिली आहे. विशेष परिस्थितीत अधिवेशन घेतले जात असल्याने सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती संरक्षणमंत्री व सभागृह उपनेते राजनाथ सिंह यांनी सभागृहात केली.

चीनबाबत सरकारकडून आज निवेदनाची शक्यता

चीनच्या प्रश्नावर केंद्र सरकारने जनतेला माहिती द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यासंदर्भात मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. सोमवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, चीनच्या मुद्दय़ावर सर्व खासदारांनी सन्यदलाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. या विनंतीद्वारे केंद्र सरकारने विरोधकांना चीनच्या प्रश्नावर सबुरीचे धोरण स्वीकारण्याची अप्रत्यक्ष सूचना केली. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर जवान अत्यंत प्रतिकूल हवामानात देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत. आता तिथे बर्फवृष्टीही सुरू होईल. अशा बिकट काळात संसदेचे सर्व सदस्य आपल्या जवानांना नि:संदिग्धपणे पािठबा देतील अशी अपेक्षा आहे, असे मोदी म्हणाले.