सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेसने या राज्यातील पक्षाची धुरा ज्येष्ठ नेते राज बब्बर यांच्याकडे सोपविली आहे. राज बब्बर यांची उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी येथे केली.

अध्यक्ष राज बब्बर यांच्यासह राजाराम पाल, राजेश मिश्रा, भगवती प्रसाद आणि इम्रान मसूद यांची पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असेही पक्षाच्या वतीने घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी-वढेरा सक्रिय प्रचार करणार का, असे विचारले असता आझाद म्हणाले की, काँग्रेसशी संबंधित प्रत्येकाला भूमिका पार पाडावयाची आहे.