पेशावर : दिवंगत ‘शोमन’ राज कपूर यांचे जन्मस्थळ असलेली  पेशावर शहरातील ‘कपूर हवेली’ पाडून त्या जागेवर व्यापारी सुंकल उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.  दिवंगत बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे पाकिस्तानातील हे  वडिलोपार्जित घर जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता आहे. या जागेच्या सध्याच्या मालकाने तेथे व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घातला आहे.

खैबर-पख्तुन्वा प्रांतातील पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार परिसरातील ‘कपूर हवेली’चे वस्तुसंग्रहालयात रूपान्तर करण्याचा निर्णय २०१८ मध्ये पाकिस्तान सरकारने घेतला होता. ऋषी कपूर यांनी केलेल्या विनंतीवरून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी, सरकार हवेलीचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करील, असे आश्वासन ऋषी कपूर यांना दिले होते.

या हवेलीत आता भुतांचे वास्तव्य असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे, त्याचप्रमाणे हवेली मोडकळीस आली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे, असेही नागरिक सांगतात. सध्या या हवेलीची मालकी शहरातील धनाढय़ जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांच्याकडे आहे.

पर्यटनस्थळ विकसित करण्याची योजना

फाळणीच्या आधी १९२० च्या दरम्यान पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी ही हवेली बांधली होती. याच वास्तूत पृथ्वीराज यांचा लहान भाऊ त्रिलोक कपूर आणि पृथ्वीराज यांचे पूत्र राज कपूर यांचा जन्म झाला. या हवेलीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन प्रांतिक सरकारला ती विकत घेऊन तिचे पर्यटकांसाठी मूळ स्वरूपात जतन करावयाचे आहे. तथापि, सध्या या जागेचे मालक असलेले इसरार यांना ही इमारत जमीनदोस्त करून या मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याची इच्छा आहे.