भारतात आधुनिक विचारांचा लढा उभारणाऱ्या आणि सतीप्रथी, बालविवाह यांसारख्या प्रथा बंद करण्यासाठी आग्रही असलेल्या राजा राममोहन रॉय यांना आज गुगलने आदरांजली वाहिली आहे. २४६ व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांचे डुडल तयार करत त्यांना मानवंदना दिली आहे. राजा राममोहन रॉय यांनी शेकडो वर्षापूर्वी महिलांच्या अधिकाराचे समर्थन करत स्त्रीयांची समाजातील विविध जाचातून सुटका होण्यासाठी पुढाकार घेतला होता. समाजसुधारक म्हणून ओळख असणाऱ्या राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी येथे त्यांचा जन्म झाला. हेच निमित्त साधत गुगलने अतिशय आकर्षक असे डुडल बनवले आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एका भारतीय समाजसुधारकाची जागतिक स्तरावर अशाप्रकारे दखल घेतली जाणे ही अतिशय आनंदाची बाब आहे.

त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी चार भाषा अवगत होत्या. फारसी आणि अरबी भाषेबरोबरच त्यांनी संस्कृत भाषेचाही अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी वैदीक ग्रंथांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. श्रुती, स्मृती, पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा त्यांनी सखोल अभ्यास केला. मूर्तीपूजा अयोग्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तत्कालिन समाजाला ते पटणारे नव्हते. त्यामुळे आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून ब्रिटिश सरकारकडे अर्ज करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यावेळी दिल्लीच्या बादशहाने खूश होऊन त्यांना ‘राजा’ हा किताब देऊन गौरवले होते.