जर तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तिंची नावं ठेवण्यात येतील असं आश्वासन भाजपाचे नेते राजा सिंग यांनी दिलं आहे. याचसंदर्भात काँग्रेसच्यावतीने रेणुका चौधरी यांनी पक्षाचे मत मांडले आहे. एएनआयया वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी यांनी सिंग यांना आधी स्वत:चे नाव बदला असा खोचक सल्ला दिला आहे.

अशी डायलॉगबाजी केल्याने मतं मिळतील असं राजा सिंग यांना वाटतं असावं असं सांगतानाच चौधरी यांनी सिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मी स्वत: हैदराबादी आहे आणि आम्हाला स्वत:ला हैदराबादी म्हणून घेण्यात गर्व वाटतो. राजा सिंग कोण आहे? जर त्यांना हैदराबाद नावाबद्दल आक्षेप आहे तर त्यांनी आधी स्वत:चे नाव बदलावे. त्यांच्या नामांतरणाला कोणाचा विरोध नसेल अशी खोचक टिका चौधरी यांनी एएनआयशी बोलताना केली. तसेच पुढे बोलताना त्यांनी सिंग यांनी नामांतरणाचा प्रयत्न केल्यास त्यांच्या अडचणी वाढतील असेही चौधरी यांनी सांगितले. आमची ओळख, शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास सिंग यांना खूप त्रास सहन करावा लागेल अशा शब्दात सिंग यांना चौधरींनी इशाराच दिला.

“भाजपाचं सरकार तेलंगणात जर सत्तेत आलं तर आमचं पहिलं प्राधान्य विकासाला असेल. तर दुसरं प्राधान्य हे शहरांची नावं बदलण्याला असेल. शहरांची नावं थोर व्यक्तिंची असली पाहिजेत. ज्यांनी राष्ट्रासाठी, तेलंगणासाठी व समाजासाठी कार्य केलंय अशा थोरांची नावं शहरांना द्यायला हवीत,” राजा सिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले होते. त्यावरून काँग्रेच्या रेणुका चौधरींनी सिंग यांना स्वत:चे नाव बदलण्याचा सल्ला दिला.

उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या सरकारनं तिथल्या शहरांची नावं बदलल्याचं उदाहरण समोर आहे. फैजाबाद जिल्ह्याचं नामांतर अयोध्या करण्यात आलं आहे. अलाहाबादचंही नामांतर करुन त्याला प्रयागराज नाव देण्यात आलं आहे. याशिवाय भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादचे नाव कर्णावती असे करण्याचा मानसही व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर सिंग यांनी हा नामांतरणाचा निर्णय तेलंगणामध्येही घेऊ असं सांगितलंय.

तेलंगणामध्ये किंवा आधीच्या आंध्र प्रदेशमध्ये आत्तापर्यंत भाजपाला सत्ता मिळालेली नाही. आता तिथं निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. असदुद्दिन ओवेसी हे एमआयएमचे हैदराबाद मतदारसंघात निवडून आलेले खासदार आहेत. तर तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.