निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. आता याप्रकरणात काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी उडी घेतली असून त्यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना मार्मिक सल्ला दिला आहे. पद्मावती चित्रपटामुळे सुरू असलेल्या वादामुळे राजस्थानी महिलांच्या स्थितीवर लक्ष वेधण्याची ही नामी संधी असल्याचे सांगत शिक्षण हे डोक्यावरील पदरापेक्षा जास्त महत्वपूर्ण असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. पद्मावती चित्रपट हा सहा शतकांपूर्वीच्या महाराणीवर नव्हे तर राजस्थानी महिलांच्या स्थितीवर ध्यान केंद्रित करण्याची एका नामी संधी आहे. राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे. पदरापेक्षा शिक्षण खूप महत्वाचे आहे, असे थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पद्मावती चित्रपट एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील विषयावरून काही संघटना तीव्र विरोध करत आहेत. विशेषत: राजपूत समाजाने हा चित्रपट इतिहासाची मोडतोड करत असून राणी पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. परंतु, भन्साली यांनी मात्र हे सर्व दावे फेटाळले आहेत. दुसरीकडे केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि भाजप नेते अर्जुन गुप्ता यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून संजय भन्साळी यांना देशद्रोहासाठी शिक्षा केली पाहिजे असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दर्शवला आहे. तर अनेक चित्रपट संघटनांनी पद्मावती चित्रपटाला पाठिंबा दिला असून चित्रपटाला विरोध करणाऱ्या राजपूत समाजाविरोधात सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.