उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे शेकडो नवजात बालकांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच राजस्थानमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. बांसवारा येथील महात्मा गांधी रूग्णालयात ८१ दिवसांत ५१ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. कुपोषणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बांसवारा येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपास केला जात असल्याचे सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही बोलता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी गोरखपूर, छत्तीसगड आणि झारखंड येथील बालकांचा मृत्यू होण्याचे वृत्त आले होते. राजस्थानसहित या तिन्ही राज्यांमध्ये भाजप सरकार सत्तेवर आहे.

गोरखपूर येथील बीआरडी रूग्णालयात फक्त ऑगस्ट महिन्यात ४१५ बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी योगी सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. काही बालकांचा तर ऑक्सिजनच्या कमतरतेअभावी मृत्यू झाला होता. या वेळी योगी सरकारमधील आरोग्यमंत्र्यांनी तर ऑगस्टमध्ये बालकांचा मृत्यू होतच असतो, असे असंवेदनशील उत्तर दिले होते. यावरून मोठा गोंधळ उडाला होता.

तर झारखंडच्या दोन रूग्णालयात यावर्षी आतापर्यंत ८०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश मृत्यू हे इन्सेफलाइटिसमुळे झाले आहेत. राजेंद्र इन्स्टि्टयूट ऑफ मेडिकल सायन्सचे (रिम्स) संचालक बी.एल.शेरवाल यांनी या वर्षी ६६० बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. जमशेदपूर येथील महात्मा गांधी मेमोरियल रूग्णालयात चार महिन्यांत १६४ बालकांचा मृत्यू झाला आहे.