करोना संकटकाळात ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात ब्लॅक फंगसचं दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसात देशांमध्ये ब्लॅक फंगसची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. काही जणांना या ब्लॅक फंगसमुळे जीव गमवावा लागला आहे. तर काही जणांचे डोळे यामुळे निकामी झाले आहेत. या आजाराची तीव्रता पाहता राजस्थान सरकारने ब्लॅक फंगस साथीचा आजार असल्याचं जाहीर केलं आहे. आरोग्य विभागानं बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. राजस्थान रोग नियंत्रण अधिनियम -२०२० च्या कलम ४ अंतर्गत ब्लॅक फंगस साथीचा आजार असल्याचं अधिसूचित केलं गेलं आहे. राजस्थानमध्ये जवळपास १०० जणांना ब्लॅक फंगस झाल्याचं समोर आलं आहे. देशातील वाढत्या ब्लॅक फंगस आजाराप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी चिंता व्यक्त केली होती.  राजस्थानमध्ये या रुग्णांच्या उपचारासाठी जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात एक वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

करोना आजार बळावलेल्या तसेच त्यातून बरे झालेले मात्र मधुमेही, एड्सबाधित, कर्करोगग्रस्त, क्षयरोगी, किडनी विकार रुग्ण, डायलिसिसवर असलेले, आंतर अवयवांचे विकार असणारे तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजार होण्याची दाट शक्यता आहे.

दिल्लीत ब्लॅक फंगसमुळे पहिला मृत्यू

संसर्ग शरीराच्या कुठल्या भागाला झाला आहे, त्यावरून आजाराची लक्षणे दिसतात. डोळ्याच्या भागात याचा संसर्ग झाला, तर नाक सतत वाहत राहणे, नाक चोंदणे, डोळ्यांतून पाणी येणे, चेहरा सुजणे, डोळा लाल होणे, ताप येणे, डोके दुखणे, डोळ्यांना दोन प्रतिमा दिसणे अशी लक्षणे दिसतात.