राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजपाकडून आक्रमक प्रचार सुरु आहे. सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेसला घेरले आहे. काँग्रेस भ्रष्टाचार, जातीयवाद आणि घराणेशाहीच्या राजकारणापुढे विचारच करु शकत नाही. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि घराणेशाही हाच काँग्रेसचा इतिहास आहे. काँग्रेसने दिलेली अर्धवट आश्वासने विद्यमान सरकार पूर्ण करत आहे. खोटी आश्वासने देणारे आमचे सरकार नाही. काँग्रेसने नेहमी फसवी आश्वासने दिली. त्याचे परिणाम देश आजही भोगत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, काँग्रेसचे नेते कधी गांधी कुटुंबीयांच्या बाहेर जाऊन विचार करु शकत नाहीत. सीताराम केसरी यांचे उदाहरण देत ते म्हणाले की, तुम्ही पाहिले असेल की सोनिया गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्यासाठी केसरींना कशा पद्धतीने अपमानित केले. सत्य हे आहे की, काँग्रेसचे नेते आणि गांधी कुटुंबीय कोणत्याही गांधी सदस्यांशिवाय पक्षाच्या सर्वोच्च पदावर पाहू इच्छित नाहीत.

सीताराम केसरींना स्वच्छतागृहात बंद करुन त्यांना काँग्रेस अध्यक्ष पदावरुन काढण्यात आले. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या निधनानंतरही त्यांना अपमानित करण्यात आले. देशातील लोकांच्या स्मृती पटलावरुन ते दृश्य आजही जात नाही, असेही गोयल म्हणाले. दरम्यान, राजस्थानमध्ये येत्या ७ डिसेंबर रोजी सर्व २०० जागांवर मतदान होणार आहे.