राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यामध्ये भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने १३ जणांना चिरडले आहे. यामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रूग्णालयात दाखल केले आहे. गंभीर जखमीना उदयपूरला हलवण्यात आले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बिंदोलीमध्ये (बिंदोली म्हणजे लग्नापूर्वीच्या रात्री नवरीमुलीचा निघणारा जुलूस) अचनाक ट्रक घुसला. त्यामुळे जागीच नऊ जणांचा मृत्यू झाला तर रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान चार जणांनी जीव सोडला.

प्रतापगढ -चित्तौडगढ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११३ वर असणाऱ्या अंबावली गावातून बिंदोली निघाली असताना जमावामध्ये अचनाक भरधाव वेगाने ट्रक घुसला. अचानक ट्रक अंगावर आल्यामुळे लोकांची एकच धावपळ उडाली. ९ जणांचा जागीच तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये नवरीमुलीचाही समावेश आहे. या अपघातामुळे राजस्तानमधील गाडोलिया समाजावर शोककळा पसरली आहे.

प्रत्यक्ष्यदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, कोळसा भरलेला ट्रक प्रतापगढकडे निघाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बिंदोलीमध्ये घुसला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दुर्घटेनेची माहिती कळताच प्रतापगढ जिल्हाध्यक्ष रामसिंह राजपुरोहित आणि एसपी अनिल कुमार यांनी रूग्णालयात धाव घेतली.