राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी बस नदीत कोसळून २६ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेत १४ प्रवासी जखमी झाले असून अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

सवाई माधोपूरवरुन लालसोट येथे जाणारी खासगी बस शनिवारी सकाळी बनास नदीच्या पुलावरुन जात होती. यादरम्यान बस संरक्षक कठडा तोडून नदीत कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. जयपूरवरुन बचावपथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.