बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांना पदावरुन हटवलं जात असल्याची घोषणा केली. दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले असून भाजपाच्या सरकार पाडण्याच्या षडयंत्रात ते सहभागी होते असं म्हटलं आहे.

सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली. “घोडेबाजार सुरु असल्याची आम्हाला कल्पना होती. अखेर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. भाजपा देशभरात घोडेबाजार करत असून त्यात सहभागी आहे,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलटदेखील षडयंत्रात सहभागी होते असा आरोप केला.

आणखी वाचा- उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतल्यानंत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींची तसंच सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाची माहिती दिली. “गेल्या अनेक दिवसांपासून घोडेबाजार सुरु असल्याने पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेणं गरजेचं होतं. हे खूप मोठं षडयंत्र होतं हे आम्हाला माहिती आहे. यामुळे आमचे काही मित्र मार्गापासून भरकटले असून दिल्लीला गेले आहेत,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं

आणखी वाचा- “गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर…”; उमा भारतींची तिखट प्रतिक्रिया

“सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. भाजपा सर्व खेळ खेळत आहे. भाजपाने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात जी टीम होती तिच टीम येथे काम करत आहे,” असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे.