काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नेमले जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अद्याप यासंदर्भातलं नेमकं चित्र स्पष्ट झालेलं नाही. अशोक गेहलोत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार की दोन ते तीन नेत्यांना कार्यकारी अध्यक्षपद दिलं जाणार हे नक्की व्हायचं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गेहलोत यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी सुरू आहे.

बुधवारी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांनाच अध्यक्षपदी रहा अशी विनंती केली मात्र ती त्यांनी अमान्य केली असं सूत्रांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर गांधी घराण्यातली व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नको असं राहुल गांधी यांनी सुचवलं होतं. मात्र त्यांनी मांडलेला हा ठराव कोणीही मान्य केला नव्हता. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय नक्की केलेला दिसतो आहे. त्यांनी हे पद सोडलं तर प्रियंका गांधी अध्यक्ष होतील का? अशीही चर्चा रंगली होती. आता मात्र अशोक गेहलोत यांच्या गळ्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडू शकते.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. ज्यापैकी एकट्या भाजपाने ३०३ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यांना कुणीही तसा निर्णय घेऊ दिला नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते असतील असं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं. तर काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेला नकारात्मक प्रचार भोवला असं मत व्यक्त केलं. पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी जरी राहुल गांधी यांच्या नावाला अध्यक्ष म्हणून पसंती दर्शवलेली असली तरीही राहुल गांधीच या पदासाठी इच्छुक नाहीत अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्याचमुळे अशोक गेहलोत यांचं नाव अध्यक्ष म्हणून चर्चेत आहे.