देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. देशातल्या वैद्यकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडाही भासू लागला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता लॉकडाउन हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या या भूमिकेला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही संमती दर्शवली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, राष्ट्रीय लॉकडाउन हा एकमेव पर्याय उरल्याच्या राहुल गांधी यांच्या मताचं मी समर्थन करतो. आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर एका वर्षाहून अधिक काळापासून प्रचंड ताण आहे. आपण त्यापैकी अनेकांना गमावलंही आहे. आपण सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहोत. आपल्याला ऑक्सिजन, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागलाच आहे. मात्र तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आता वैद्यकीय मनुष्यबळाचाही तुटवडा भासू शकतो.


विषाणूची साखळी तोडण्यासाठी एक सुनियोजित लॉकडाउन मदत करेल. गरीब, स्थलांतरीत मजूर आणि सामान्य लोकांचे गेल्या वर्षी झालेले हाल यावेळी टाळता येतील. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनीही ट्विट करत भारत सरकारला सल्ला दिला होता. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”भारत सरकारला हे लक्षात येत नाहीये की, या वेळी करोनाची ही लाट रोखण्यासाठी समाजातल्या काही घटकांना न्याय(NYAY) योजनेचा लाभ मिळवून देऊन संपूर्ण लॉकडाउन करणे हा एकमेव उपाय आहे. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे”.

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून देशात दररोज तीन लाखांच्या वर करोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक राज्यांमध्ये विकेंड लॉकडाउन, रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.