राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. कथित खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून बुधवारी सकाळी घोटाळ्या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये अशोक गेहलोत यांचा भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या कंपनीचाही समावेश आहे. अग्रसेन यांची मालकी असणाऱ्या सर्व ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निटकवर्तीयांवर आयकर छापे, भाजपाचा डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडून जोधपूरमधील अनुपम कृषी कंपनीवर छापा टाकण्यात आला आहे. ही कंपनी अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीची आहे. कस्टम विभागाने खटला चालवत कंपनीवर सात कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. ईडीकडून राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

याआधी १३ जुलै रोजी आयकर विभागाकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले होते. संबंधित नेत्यांनी भारताबाहेरील केलेल्या व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करत आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला होता.

आयकर विभागाने काँग्रेस नेते धर्मेंद्र राठोड यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. धर्मेंद्र राठोड हे अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय समजले जातात. याशिवाय आयकर विभागाने राजीव अरोरा यांच्या निवासस्थानीदेखील छापा टाकला होता. राजीव अरोरा एका ज्वेलरी कंपनीचे मालक असून त्यांनी कर चुकवल्याप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. दिल्ली आणि राजस्थानमधील १२ हून अधिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते.