पंजाबपाठोपाठ राजस्थानातील काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराजी व्यक्त करत काही महिन्यांपूर्वी सचिन पायलट यांनी बंडखोरीचं निशाण फडकावलं होतं. मात्र, त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आलं होतं. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि दिलेली आश्वासनं पुर्ण न झाल्यानं पायलट गट पुन्हा सक्रिय झाला आहे. भाजपा पायलट यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. पण पायलट यांनी फेटाळून लावलं. त्यानंतर सचिन पायलट दिल्लीत दाखल झाले आहेत. पायलट यांची प्रियांका गांधीकडून मनधरणी केली जाणार असल्याचं वृत्त असून, दिल्लीतील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

भाजपात प्रवेश करणाऱ्या असल्याच्या वृत्ताचं खंडण केल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत दाखल झाले आहेत. राजस्थान काँग्रेसमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट असा अंतर्गत संघर्ष असून, हा संघर्ष गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा उफाळून येताना दिसत आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये असाच संघर्ष बघायला मिळाला होता. मात्र, हे बंड शमवण्यात काँग्रेसला यश आलं होतं. गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करून त्यात आपल्या निष्ठावंताना संधी दिली जावी, अशी मागणी पायलट यांच्याकडून केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर नियुक्त्यांना विलंब होत असल्यानं पायलट गटाने नाराजीचा सूर लावला आहे.

हेही वाचा- सचिन पायलट जीव द्या म्हणाले तर जीव पण देऊ; काँग्रेस आमदाराची टोकाची भूमिका

काँग्रेस नेते संपर्कात… प्रियांका गांधी करणार मध्यस्थी

त्यातच उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्याने पायलट यांच्याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहे. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांचं विधान पायलट यांनी फेटाळून लावलं आहे. त्यानंतर पायलट हे अचानक दिल्लीत दाखल झाले. शुक्रवारी रात्री पायलट दिल्लीत पोहोचले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पायलट यांच्या संपर्कात असून, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या राजस्थानातील राजकीय तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचं माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे सचिन पायलट आणि त्यांच्या गटाची नाराजी दूर करण्यात प्रियांका गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांना किती दिवसात यश येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- पंजाब प्रदेश काँग्रेसबाबतचा अहवाल सोनिया गांधी यांना सादर

रिटा बहुगुणांचं सचिन तेंडुलकरशी बोलणं झालं असेल…

भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट यांच्याबद्दल केलेल्या दाव्याला पायलट यांनी फेटाळून लावले. “मी सुद्धा ऐकलं आहे. रिटी बहुगुणा जोशी यांनी सचिनसोबत बोलण झाल्याचं म्हटलं आहे. कदाचित त्या सचिन तेंडुलकरशी बोलल्या असतील. त्यांच्यात माझ्यासोबत बोलण्याची हिंमत नाहीये,” असं स्पष्ट करत पायलट यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या सर्व वृत्तांवर पडदा टाकला.