चुलत भावांनी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघेही भाऊ एका मुलीच्या प्रेमात होते असा पोलिसांना संशय आहे. राजस्थानमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी दोघांचे मोबाइल जप्त केले असून सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.

महेंद्र गुज्जर आणि देवराज गुज्जर अशी या तरुणांची नावं आहेत. दोघेही २३ वर्षांचे होते. रविवारी सकाळी त्यांनी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांच्या हातावर आशा नाव लिहिण्यात आलं होतं. दोघांचेही फोन तपासले असता त्यामधील फोटो आणि इतर गोष्टींवरुन दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात असल्याचं दिसत आहे. या मुलीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

प्राथमिकदृष्ट्या, दोघा भावांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र सुसाईड नोट न मिळाल्याने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.