अकबर राजा हा दहशतवादी होता, असे वादग्रस्त विधान करून राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.     यापूर्वी अकबराच्या नावाआधीची महान ही उपाधी काढून टाकल्यामुळे वासुदेव देवनानी चर्चेत आले होते. राजस्थानमधील अकबर किल्ल्याचे नाव बदलून अजमेर किल्ला करण्यात आल्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. यासंबंधीच्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवनानी यांनी अकबराचा उल्लेख दहशतवादी असा केला. मी राष्ट्रवादी असल्याने अजमेरमधील अकबर किल्ल्याचे नाव अजमेर किल्ला करावे, असे मी म्हटले होते. राजस्थानमधील ज्या ठिकाणांना दहशतवाद्यांची नावे आहेत ती नावे बदलण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे देवनानी यांनी सांगितले. यासाठी आपण कायदेशीररित्या प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अकबर किल्ल्याचे नाव अजमेर किल्ला केल्यामुळे काही दिवसांपूर्वी देवनानी यांना धमकीची पत्रे आली होती. माझा दृष्टीकोन राष्ट्रवादी आहे, हे राजस्थानमध्ये सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच मला ही धमकीची पत्रे आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, मी अकबराला दहशतवादी नव्हे तर आक्रमण करणारा म्हटल्याची सारवासारव देवानानी यांनी केली. मला दहशतवादी नव्हे तर हल्लेखोर म्हणायचे होते. अकबराने भारतावर आक्रमण केले. त्यामुळेच आम्ही पाठ्यपुस्तकात अकबराचा महान असा उल्लेख असणारा धडा अभ्यासक्रमातून वगळला. मी राष्ट्रवादी आहे, हे सत्य आहे. त्यामुळे मला धमकी देण्याच्या आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी देवनानी यांनी पुन्हा एकदा हल्दीघाटीतील लढाई अकबराने नव्हे तर महाराणा प्रताप यांनी जिंकल्याचा पुनरूच्चार केला.

काही दिवसांपूर्वी राजस्थान विद्यापीठाच्या बैठकीत राजस्थान सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी इतिहास बदलण्याची गरज व्यक्त केली. ‘महाराणा प्रताप यांच्या हल्दीघाटीतील युद्धाची पुन्हा एकदा चर्चा व्हायला हवी. कारण या युद्धाबाबत इतिहासकारांची मते वेगवेगळी आहेत’, या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता ‘महाराणा प्रताप हल्दीघाटीची लढाई मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली केली होती. यामध्ये त्यांनी अकबरच्या सेनेचा पराभव केला होता,’ असे राजस्थानमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. ‘राजस्थानचा विचार हा अतिशय गौरवशाली आहे. आजच्या पिढीला हा इतिहास शिकवणे आवश्यक आहे. अकबर एक परकीय आक्रमक होता आणि राणा प्रताप यांनी ते युद्ध जिंकले होते, हे वास्तव आहे. ही गोष्ट सिद्धदेखील झाली आहे. इतिहासात विद्यार्थ्यांना परकीय आक्रमकांशी शिकवले जाते. महाराणा प्रताप एक शूर आणि देशभक्त शासक होते. त्यामुळे चूक सुधारुन महाराणा प्रतापच लढाई जिंकले होते, हे सत्य सांगितल्यास त्यात कोणतीही चूक नाही,’ असे राजस्थान सरकारचे मंत्री कालीचरण यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते. राजस्थानच्या भूमीवर १५७६ मध्ये हल्दीघाटी युद्ध झाले होते. ‘राजस्थान विद्यापीठाच्या पुस्तकांमध्ये महाराणा प्रताप १५७६ मधील लढाई जिंकले होते, असा उल्लेख आहे. यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आम्ही याबद्दल कुलपतींना प्रस्ताव पाठवला आहे,’ असे भाजप आमदार आणि राजस्थान विद्यापीठाचे सिंडीकेट सदस्य सतीश चंद्रा यांनी म्हटले आहे.