राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपा नेत्या व विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात थेट मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मानवेंद्र सिंह हे भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आहेत. झालरापाटन या मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असून याच मतदारसंघातून वसुंधरा राजे यादेखील निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

काँग्रेसने शनिवारी दुपारी राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात मानवेंद्र सिंह यांना झालरापाटन या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून भाजपातर्फे वसुंधरा राजे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट जसवंत सिंह यांच्या मुलाला उमेदवारी देऊन काँग्रेसने भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. झालावाड जिल्ह्यात झालरापाटन या मतदारसंघाचा समावेश होतो.

झालावाड जिल्ह्यात डग, झालरापाटन, खानपूर आणि मनोहर थाना असे चार मतदारसंघ येतात. या चारही मतदारसंघांवर भाजपाचे वर्चस्व आहे. झालावाड हा भाग वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. शनिवारी भाजपाने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या पाठोपाठ काँग्रेसनेही दुसरी यादी जाहीर केली आहे. यात ३२ उमेदवारांचा समावेश आहे.

शनिवारी झालरापाटन येथून वसुंधरा राजे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राजे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी दहा वाजता विशेष विमानाने झालावाडमधील कोलाना विमानतळावर पोहोचल्या. यानंतर त्यांनी पुरातन बालाजी मंदिरात जाऊन पूजा केली. भाजपाचे सरकार सत्तेत यावी, असे साकडे त्यांनी घातले. यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. २००३ पासून वसुंधरा राजे या मतदारसंघातून निवडून येत आहेत.