राहुलभाई सर्वांना बरोबर घेऊन पुढे जात आहेत. माणुसकीचे ते मुर्तिमंत उदाहरण आहेत. लवकरच ते देशाची धुरा आपल्या हाती घेतील, असा आशावाद पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी भाजपावर टीकाही केली आहे. भाजपाचे नवे नाव हे ‘जीटीयू’ असून जीटीयू म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असा टोला त्यांनी लगावला आहे. ‘बुरे दिन जानेवाले है, राहुल गांधी आनेवाले है’ ही नवीन घोषणा देत त्यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना दिले.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसने जल्लोषाला सुरुवातही केली आहे. काँग्रेसकडून विविध नेते आता प्रतिक्रिया देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवज्योतसिंग सिद्धू बोलत होते.

राहुल गांधी यांनी पक्षाला शिस्त लावली. ते लवकरच देशाची धुरा आपल्या हाती घेणार आहेत. त्यांचे हात मजबूत आहेत. भाजपाची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी अवस्था झाली आहे. भाजपाचे नवे नाव ‘जीटीयू’ आहे, असा टोला त्यांनी लगावला. देशातील बुरे दिन जात आहेत, त्यामुळे ‘बुरे दिन जानेवाले है, राहुल गांधी आनेवाले है’, असे ते म्हणाले.

दरम्यान, भाजपाचे कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेसचे कौतुक केले आहे. विजयवर्गीय एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसने चांगली तयारी केली तसेच एकत्र येऊन निवडणुका लढवल्या. मात्र, अद्याप पूर्ण चित्र स्पष्ट झालेले नसल्याने मध्य प्रदेशात भाजपाच सरकार स्थापन करेल असेही त्यांनी म्हटले आहे.