राजस्थानमधील निकाल पाहता तेथील जनतेने वसुंधरा राजे यांना नाकारल्याचे दिसते. जनतेच्या रोषामुळे त्यांना सत्तेतून बेदखल व्हावे लागले. परंतु, या निकालामुळे राजस्थानमधील २८ वर्षे जुना विक्रम कायम राहिला आहे. राजस्थानमध्ये १९९२ पासून सलग एकदा भाजपा आणि एकदा काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे.

४ मार्च १९९० मध्ये भाजपाचे भैरोसिंह शेखावत मुख्यमंत्री झाले होते. ते १५ डिसेंबर १९९२ पर्यंत या पदावर राहिले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुन्हा ४ नोव्हेंबर १९९३ मध्ये शेखावत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. ते २९ नोव्हेंबर १९९८ पर्यंत मुख्यमंत्री होते.

त्यानंतर पाच वर्षांसाठी काँग्रेसकडून अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले. नंतरच्या पाच वर्षांत भाजपाच्या वसुंधरा राजे शिंदे मुख्यमंत्री झाल्या. वसुंधरा राजे तेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या होत्या. २००८ मधील निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा विजय झाला आणि अशोक गेहलोत यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. वर्ष २०१३ च्या निवडणुकीत भाजपाचे पुनरागमन झाले आणि वसुंधरा राजे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.

आता सध्या काँग्रेसने जवळपास बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे आलटूनपालटून सरकार येण्याची परंपरा यंदाही कायम राहिल्याचे दिसते. दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताने सत्ता येईल. मागील वेळी आमच्याकडे फक्त २१ जागा होत्या. यावेळी जनतेने भाजपाला धडा शिकवला आहे. भाजपा सरकारविरोधात लोकांना राग होता. काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा आहेत. राहुल गांधी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असे राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे.