सत्ताधारी काँग्रेसने राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. काँग्रेसला ९६१ तर भाजपला ७३७ प्रभागांमध्ये विजय मिळाला. मंगळवारी हे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात ४९ पैकी २३ नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे, तर भाजपला सहा ठिकाणी सत्ता मिळाली आहे. इतरांना २० पालिकांमध्ये यश मिळाले आहे.

शनिवारी राजस्थानमधील ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान झाले होते. एकूण २१०५ प्रभागांसाठी हे मतदान झाले. हे निकाल अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. सरकारच्या कामगिरीवर जनतेने विश्वास ठेवल्याचे गेहलोत यांनी सांगितले. बहुजन समाज पक्षाला १८ तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला तीन प्रभागांमध्ये विजय मिळवता आला. राजस्थानमधील ३३ जिल्ह्य़ांपैकी २४ जिल्ह्य़ांमध्ये निवडणूक झाली होती.  त्यात तीन महापालिका, १८ नगरपालिका व २८ नगर पंचायतींचा समावेश होता. महापौर, नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष निवड पुढील मंगळवार व बुधवारी होणार आहे.