जयपूर : करोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी अथवा मुख आच्छादन घालणे अनिवार्य करणारे दुरुस्ती विधेयक राजस्थान सरकारने शनिवारी राज्य विधानसभेत मांडले.

राजस्थान संसर्गजन्य रोग (दुरुस्ती) विधेयक २०२० संसदीय कार्य मंत्री शांती धारिवाल यांनी मांडले. या कायद्याच्या कलम ४ मध्ये नवे उपकलम जोडण्यात आले असून, त्याद्वारे मुखपट्टी अथवा आच्छादनाद्वारे चेहरा व नाक योग्यरीतीने झाकल्याशिवाय लोकांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

‘मुखपट्टीच्या वापरामुळे कोविड-१९ वर मोठय़ा प्रमाणात नियंत्रण ठेवण्यास आणि लाखो जीव वाचवण्यास मदत होते, असे जगभरातील आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे’, असे या विधेयकाच्या विवरणात म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणे, कामाचे ठिकाण, सामाजिक व राजकीय मेळावे, तसेच सार्वजनिक व खासगी वाहतूक यांत मुखपट्टी घालणे अनिवार्य करण्यात यावे असे राज्य सरकारचे मत आहे, असेही या विवरणात नमूद केले आहे.