काँग्रेसला धक्का : उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे बंड ; ३० आमदारांच्या समर्थनाचा दावा

नवी दिल्ली : पक्षांतर्गत बंडाळीमुळे मध्यप्रदेशातील सत्ता गमवावी लागलेल्या काँग्रेसला राजस्थानमध्येही धक्का बसला आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी बंडाचा झेंडा हाती घेतला. आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत पायलट यांनी अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला.

राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात संताप व्यक्त करत रविवारी काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खंदे समर्थक आणि संघटनात्मक महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या विकोपाला गेलेल्या सत्तासंघर्षांचा अहवाल राहुल यांना दिला. त्यात पायलट यांना पाठवलेल्या नोटिसीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पायलट यांनी रविवारी दिल्लीत ठाण मांडले होते.

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी, राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडण्याचे डावपेच भाजप आखत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्याआधारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या कथित कारस्थानाच्या चौकशीला गती दिली. त्यासंदर्भात गेहलोत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन २५-३० कोटी देऊन काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा आणि राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप पुन्हा केला. गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर राजस्थान पोलिसांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाच चौकशीसाठी नोटीस बजावली. गेहलोत यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून ‘‘माझीही पोलीस चौकशी करणार आहेत,’’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे गृहखाते गेहलोत यांच्याकडेच आहे.

काय घडू शकते?

– विधानसभेत १०७ एवढे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे.

– काँग्रेसच्या दोन तृतीयांश म्हणजे १०७ पैकी ७२ आमदारांनी पक्षांतर केले, तर ते पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचू शकतात. परंतु, एवढय़ा मोठय़ा संख्येने काँग्रेसचे आमदार फुटणे अशक्य असल्याचे मानले जाते.

– भाजपतर्फे सत्ता हस्तगत करण्यासाठी मध्य प्रदेशातील ‘सत्तासूत्रा’चा वापर केला जाऊ शकतो. पायलट यांच्या समर्थक आमदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर विधानसभेतील संख्याबळ कमी होईल. त्यानंतर ते आमदार भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवू शकतात.

काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संख्याबळात ५० सदस्यांचा फरक असल्याने भाजपच्या गळाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसचे आमदार लागणे कठीण असल्याचे मानले जाते.

घोडे तबेल्यातून सुटल्यानंतर जागे होणार का – सिब्बल

राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी उघडपणे बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर टीका करणारे ट्वीट केले. पक्षाची चिंता वाटत असून सर्व घोडे तबेल्यातून सुटल्यावर आपण झोपेतून जागे होणार का? असा सवाल सिब्बल यांनी केला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखे तरुण नेते भाजपमध्ये गेले, आता पायलटही त्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले.

माकन, सुरजेवाला राजस्थानात

पायलट यांच्या बंडांनंतर राजस्थानातील सत्ता वाचविण्यासाठी कॉंग्रेसने वेगवान पावले उचलली. कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून रविवारी राजस्थानला पाठवले. ते आमदारांशी चर्चा करतील. राजस्थान सरकार स्थिर असून, ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास कॉंग्रेसने व्यक्त केला.

मध्य प्रदेशची पुनरावृत्ती?

मध्य प्रदेशमध्ये पक्षांतर्गत कोंडी होत असल्याचा आरोप करत ज्योतिरादित्य िशदे भाजपमध्ये गेले आणि त्यांच्या समर्थकांना शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये स्थानही देण्यात आले. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्योतिरादित्य िशदे यांच्यासह भाजपचे नेते पायलट यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. पायलट यांनी बंड पुकारत ३० हून अधिक आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. तसेच सोमवारी सकाळी होणाऱ्या राजस्थान काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीकडे पायलट हे पाठ फिरवणार असल्याचे समजते.

संख्याबळ

एकूण सदस्य- २००

काँग्रेस             १०७

भाजप              ७२

अपक्ष               १३

इतर पक्ष           ८