पद्मावत चित्रपटास करमुक्त करून तो राजस्थान सरकारने प्रदर्शित करावा असे ख्यातनाम वीणावादक पंडित विश्वमोहन भट यांनी सांगितले. हा चित्रपट भारतीय संस्कृती विशेष करून राजस्थानच्या लोकसंस्कृतीचा प्रसार करीत असल्याने तो  करमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वीणावादक असलेले विश्वमोहन भट हे जयपूरचे असून त्यांनी सांगितले की, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातील घूमर या गीताने राजस्थानच्या लोकसंगीताला उत्तेजन मिळणार आहे.

ऐतिहासिक नाटय़ावर आधारित असा हा चित्रपट असून कर्णी सेनेने त्याला विरोध केला आहे. ऐतिहासिक तथ्यांचे विकृतीकरण करून भावना दुखावल्याचा रजपूत समाजाचा आरोप आहे. या चित्रपटाच्या सेटची जयपूर व कोल्हापूर येथे नासधूस करण्यात आली होती. भन्साळी यांना कर्णी सेनेच्या सदस्यांनी थोबाडीत मारल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. सर्वोच्च न्यायालयाने पद्मावत या चित्रपटाच्या प्रसारणास मंजुरी दिली असून २५ जानेवारीला तो प्रदर्शित होत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा, मध्यप्रदेश या राज्यांनी चित्रपटावर घातलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. भट हे ग्रॅमी पुरस्कार विजेते असून त्यांनी सांगितले की, ज्या घुमर गाण्यावरून वादंग झाले त्यामुळे राजस्थानचे लोकसंगीत पुढे आले आहे. मी हा चित्रपट पाहिलेला नाही पण दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व त्यांच्या कामावर माझा विश्वास आहे. भन्साळी यांचा माझा चांगला परिचय असून ते जबाबदारीनेच काम करतात असे मला वाटते. भन्साळी हे चांगले कलाकार व विचारवंत आहेत. त्यामुळे या चित्रपटात काही आक्षेपार्ह नाही. या चित्रपटाने राजस्थानची प्रतिमा उंचावणार आहे व तेथील राजप्रासाद जगाच्या नकाशावर येणार आहेत. घुमरमधील महिलांनी घातलेला पोषाख हा सभ्यच नसून अतिशय सुंदर व साजेसा आहे. जे लोक या चित्रपटाला विरोध करीत आहेत त्यांनी तो अगोदर बघावा आणि मगच बोलावे, असे त्यांनी स्पष्ट केले.