राजस्थान देशातील राजकीय घडामोडींचं हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला असून, अजूनही त्यावर पडदा पडलेला नाही. सचिन पायलट समर्थक आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असतानाच भाजपानेही बहुजन समाज पक्षाच्या आमदारांसंबंधात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली.

राजस्थान सध्या सत्ता संघर्ष रंगला असून, त्याचे देशभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेसनं सोमवारी (२७ जुलै) सर्व राज्यांच्या राजभवनासमोर निदर्शनं केली. दरम्यान एकीकडे काँग्रेस अधिवेशन बोलावण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असतानाच भाजपानं बहुजन समाज पक्षाच्या आमदारांच्या प्रवेशाला विरोध करणारी याचिका राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती.

न्यायालयानं भाजपाची ही याचिका फेटाळून लावली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपाचे सहा आमदार निवडून आले होते. या सहा आमदारांच्या गटानं अशोक गेहलोत यांच्या सरकारला पाठिंबा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याविरोधात भाजपानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर झालेल्या पहिल्या सुनावणीतच सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसची मागणी फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्यानंतर आज (२७ जुलै) सकाळी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी ही याचिका मागे घेतली आहे. गरज पडल्यास काँग्रेस पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल, असं सिब्बल यांनी याचिका मागे घेतल्यानंतर सांगितलं होतं.