राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या आई आणि काकांकडून हत्या करण्यात आलेली आहे. आई आणि काकांनी पीडित महिलेचा गळा आवळून आणि नंतर जाळून तिचा मृतदेह जाळल्याचं समोर येतंय. १९ मार्च रोजी ही घटना घडली असून, पोलिसांना त्यांत्या खबरीकडून माहिती मिळाल्यामुळे गुरुवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीची आई सितादेवी आणि काका सावाराम यांना पोलिसांनी अटक केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सावाराम आणि शेषराम हे दोन भाऊ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सोनाई माझी गावचे रहिवासी होते. काही वर्षांपूर्वी हे कुटुंब आपलं राजस्थानमधील गाव सोडून पुण्यात स्थाईक झालं होतं. पुण्यात आल्यानंतर उहरनिर्वाहासाठी या परिवाराने एक दुकानही विकत घेतलं. पीडित मुलगी ही शेषराम यांची मुलगी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी शेषराम यांची मुलगी पुण्यात एका मुलाच्या प्रेमात पडली होती. मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा घरच्यांनी पोलिसांत मुलाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत मुलगा आणि मुलीला मुंबईतील दादर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलं. या प्रकरणात मुलाला अटक करण्यात आली तर मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला तिच्या घरच्यांकडे परत सोपवण्यात आलं.

काही महिन्यांपूर्वी मुलगा जामिनावर बाहेर आल्यानंतर मुलीने आपल्या घरच्यांकडे मला त्याच्याशी लग्न करण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र परिवाराने मुलीची ही मागणी साफ धुडकावून लावत तिला राजस्थानमधील आपल्या गावी देवाच्या पाया पडायला नेलं. गावी आल्यानंतर आई आणि काकाने मुलीची हत्या केली आणि परत पुण्याला परतले. पोलिस या प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्यांना हात होता का याचा तपास करत आहेत.

अवश्य वाचा – उत्तर प्रदेशात सामूहिक हत्याकांड : आरोपीने संपत्तीच्या वादातून आई-वडिलांसह भावाच्या परिवाराला संपवलं